शालिमार ते नाशिकरोड प्रीपेड रिक्षाची गरज

शालिमार ते नाशिकरोड या मार्गावर २४ तास प्रवाशांचा राबता असतो. बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांकडून रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा भाडे अकारणी करतात. अनेकदा हमरीतुमरीवर प्रसंग येतो. याकरता येथे प्रीपेड रिक्षा सुरू करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून जोर धरत आहे. परिवहन विभागाने पुढाकार घ्यावा व नागरिकांची होणारी ससेहोलपट थांबवावी असे नागरिकांचे म्हणणे आहे.

परभणीत साकारणार आधुनिक बस पोर्ट

परभणी : परभणीमध्ये तेरा कोटी रूपये खर्चून अद्ययावत बसपोर्ट उभे राहणार आहे. शिवाय जिल्ह्याकरीता वीस शिवशाही बस आणि टायर रिमोल्डींग कारखानाही मंजूर झाल्याची माहिती आमदार डॉ. राहुल पाटील यांनी दिली आहे.
राज्य परिवहन महामंडळाची परभणीमध्ये १.६० हेक्टर जागा आहे. या जागेत १९७४ पासून १४ फलाटांचे कायमस्वरूपी बसस्थानक कार्यरत आहे. दोन वर्षापूर्वी या बसस्थानकाचा दर्जा वाढविण्यासाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र, बसस्थानक व परिसरात अनेक समस्या असून, पावसाळ्यामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्याची मागणी आमदार डॉ. पाटील यांनी केली होती. त्यानंतर बसस्थानकाच्या पुनर्बांधणीच्या हालचाली सुरू झाल्या असून, नव्या अद्यावत बसस्थानकाचा आराखडा तयार करण्यासाठी महामंडळाच्या पॅनेलवरील डी. पी. डिझायनरने बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचा आराखडा महामंडळाच्या पदाधिकार्यांकडे सादर केला. या आराखड्यास मान्यता मिळाली असून, आगामी काळात बसपोर्ट निर्मितीसाठी १३ कोटी ४ लाख ४८ हजार ५९५ रूपयांच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे.
या कामात नुतन बसस्थानक इमारतीची पुनर्बांधणी, कुंपण भिंत, रस्ते तयार करणे, सेप्टिक टँक व ड्रेनेज सिस्टीम, बसस्थानकात स्टेनलेस स्टील चेअर्स, कॉलमना स्टेनलेस स्टील प्लेट्स, डेन्साइल स्ट्रक्चर, अल्युमिनिअमकम्पोझिट पॅनल, विद्युत व्यवस्थांचा समावेश आहे. नियोजित बसस्थानकाचे नियोजन करताना सध्या बसस्थानक व परिसरात भेडसावणार्या बाबींचा विचार करण्यात आला आहे. पावसाळ्यात संपूर्ण बसस्थानक परिसर पाण्याखाली जातो. याचबरोबर अधिकच्या प्लॅटफॉर्मची आवश्यकता लक्षात घेण्यात आली आहे. यात सध्याचे १० प्लॅटफॉर्म असलेले बसस्थानक १८ प्लॅॅटफॉर्मचे होणार आहे. याचबरोबर १३ आईडीयल प्लॅटफॉर्म तयार करण्यात येतील. नवीन बसस्थानक १ हजार ३०० चौरस मीटर जागेवर प्रस्तावित आहे. दोन्ही मजल्याचे क्षेत्रफळ तीन हजार ६४४ चौरस मीटर आहे. यात तळमजल्यावर क्रश व्हॉल, वेटींग हॉल, आरक्षण कार्यालय, बँक एटीएम, नियंत्रण कक्ष, डाक कार्यालय, वाहतूक कार्यालय, हॉटेल, शौचालय, महिला कक्ष, व्यावसायिक गाळे, पिण्याचे पाणी, पार्किंग सुविधा आहे. पहिल्या मजल्यावर चालक व वाहकांना राहण्यासाठी जागा, कार्यालये, एस.टी. बँक आदींची व्यवस्था आहे. याचबरोबर एलईडी स्क्रीन, सीसीटीव्ही कॅमरे, उद्घोषणा कक्ष, डिजिटल डिस्प्ले आदींचीही माहिती देण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यान्वित होईल, असेही आमदार डॉ. पाटील यांनी सांगितले.

भूमिपुत्र रावतेंचे लक्ष

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाच, त्यांनी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या माध्यमातून विकास आराखडा तयार केला होता. नंतरच्या राजकारणामध्ये त्यांच्याकडील पालकमंत्री पद गेले. पालकमंत्री असताना परभणीवर त्यांचा विशेष जिव्हाळा होता आणि त्यांचे जिल्ह्यातील कामांवर अजूनही लक्ष असल्याचे सांगण्यात येते. त्यातुनच या कामाचा नीव त्यांनी ठेवली आहे. रावते सर्वत्र स्वत:ची परभणीचा भूमीपुत्र अशी ओळख सांगतात. रावते आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यातून हे कामलवकर पूर्ण करतील, अशी परभणीकरांना अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *