वाहतूक पोलिस मारहाण प्रकरणी आमदार कडू यांना एक वर्षाची शिक्षा

अमरावती : वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अपक्ष आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचसोबत, आमदार कडू यांना ६०० रुपये दंडही भारावा लागणार आहे. अचलपूर कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे.
गेल्या वर्षी चांदूर बाजारमध्ये वाहतूक पोलिस इंद्रजित चौधरी यांना आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या प्रकरणात आज शिक्षा सुनावण्यात आली. आमदार बच्चू कडू यांना १ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, त्यासोबत ६०० रुपये दंडही भरावा लागणार आहे.

काय आहे प्रकरण?
गेल्या वर्षी २४ मार्च रोजी आमदार बच्चू कडू हे परतवाडा एस टी डेपो चौकातून जात होते. त्यावेळी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांना तिथे अनेक खासगी ट्रॅव्हल्स उभ्या असल्याच्या दिसल्या. त्यावेळी आमदार कडू यांनी त्या परिसरातील वाहतूक पोलीस इंद्रजीत चौधरी यांना बसेसवर कारवाई का करत नाही, असा जाब विचारला. त्यावेळी आमदार कडू आणि त्यांच्या सहकार्यांनी अश्लिल शिवीगाळ करुन वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की आणि मारहाण केल्याचा आरोप होता.
त्यामुळे आमदार कडू आणि त्यांच्या सहकार्यांवर परतवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बच्चू कडू यांचा दावा
दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी मारहाणीचा आरोप फेटाळला होता. पोलिसांनी नीट वाहतूक नियंत्रित न केल्यामुळे त्या परिसरात अनेक अपघात झाले आहेत. त्याबाबतचा जाब लोकप्रतिनिधी म्हणून विचारला होता. मात्र पोलिसांनी उद्धट उत्तरं दिली, त्यावेळी त्याच्यासोबत शाब्दिक वाद झाला, मात्र मारहाण झाली नव्हती, असा दावा बच्चू कडू यांनी केला होता.
इतकंच नाही तर वाहतूक पोलिसाने कर्तव्यात कसूर केल्यानेच परिसरातील वाहतुकीचे तीन तेरा वाजले, शिवाय अनेक अपघात झाले, असंही बच्चू कडू म्हणाले होते.
बाचाबाची झाल्यानंतर पोलिसाने मारहाणीची खोटी तक्रार केली, असा आरोप बच्चू कडूंनी केला आहे.
कोण आहेत बच्चू कडू?
ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे अचलपूरमधून अपक्ष आमदार आहेत. प्रहार युवा संघटनेचे ते संस्थापक अध्यक्षही आहेत. युवकांचे संघटन करुन त्याद्वारे विविध विषयांवर आंदोलनं ते करतात. आपल्या साध्या राहणीमुळे आणि हटके आंदोलनांमुळे बच्चू कडू नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *