आसन क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोंबून नेणार्या स्कूल व्हॅनवर कारवाई

’आसन क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोंबून नेणार्या स्कूल व्हॅन चालकांवर कठोर कारवाई करायला हवी. असे प्रकार आढळताच परिवहन विभागाच्या अधिकार्यांनी अशा चालक-मालकांचे परमिट तत्काळ निलंबित करून नंतर त्यांना नोटीस बजावण्याची कारवाई करायला हवी. हा प्रश्न अत्यंत गांभीर्याने घेऊन असा कठोर कारवाईचा संदेश दिल्याशिवाय नियममोडणार्यांना जाग येणार नाही’, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नोंदवले. ’पीटीए युनायटेड फोरम’ने केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्या. नरेश पाटील व न्या. नितीन सांब्रे यांच्या खंडपीठाने आसनक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना वाहनांमध्ये नेले जात असल्याच्या प्रकारांविषयी नाराजी व्यक्त केली. तसेच राज्यभरात एकूण स्कूल व्हॅन्स किती आहेत आणि त्यापैकी किती व्हॅन्सना परमिट दिलेले आहेत, याची तपशीलवार माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. तसेच या सार्या व्यवस्थेचे नियंत्रण करणारे नियमनेमके काय आहेत आणि यासंदर्भात नागपूर खंडपीठाने कोणता आदेश दिला होता त्याचीही माहिती सादर करण्यास मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांना सांगितले. केंद्र सरकारने स्कूल बसवरील नियमनासाठी अधिसूचना काढलेली आहे आणि त्याप्रमाणे राज्य सरकारने महाराष्ट्र मोटार वाहने नियमन नियमावली, २०११ तयार केलेली आहे. त्यानुसार, १२ आसनांपेक्षा कमी वाहनांना शाळकरी मुलांना वाहून नेण्याची परवानगीच नाही आणि नियमानुसार असलेल्या वाहनांनाही आधी शाळेसोबत प्रमाणित करारनामा करणे बंधनकारक आहे. परंतु, याचे पालन होत आहे की नाही, हे राज्यात परिवहन विभागाकडून काटेकोरपणे पाहिलेच जात नाही. शिवाय याविषयी नियमन करण्यासाठी प्रत्येक शाळेत वाहतूक समिती असणे बंधनकारक असूनही त्याची कठोरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही, असा आरोप याचिकादारांच्या वकिलांनी केला.

परिवहन अधिकार्यांकडून तपासणी नागपूर खंडपीठाने या प्रश्नासंदर्भात पूर्वी दिलेल्या आदेशानुसार, उन्हाळी सुट्टीमध्ये परिवहन अधिकार्यांकडून तपासणी केली जात असून, त्यात स्कूल बस व स्कूल व्हॅनकडून नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा केली जाते, असा दावा वग्यानी यांनी केला. १२पेक्षा कमी आसनक्षमतेच्या वाहनांना पूर्वीच्या नियमाप्रमाणे परमिट देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे खंडपीठाने हा तपशील सादर करण्यास सांगून पुढची सुनावणी ३१ जानेवारीला ठेवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *