टोलमुक्तीची टोलवाटोलवीच!

नाशिक ः पुणे महामार्गाचे नूतनीकरणाचे कामनाशिक मनपाच्या हद्दीवरील चेहेडी गावापासून पुढे जवळपास पूर्ण झालेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशांनुसार या महामार्गावर शिंदे गावाजवळ चेतक एंटरप्रायजेस प्रा. लिमिटेड या कंपनीने टोलनाका सुरू केला आहे. सिन्नर, संगमनेर, शिर्डी, नगर, पुणे या शहरांकडे जाणार्या वाहनांसाठी शिंदे येथील टोलनाका योग्य असला तरी मात्र शिंदे आणि जवळपासच्या चिंचोली, मोह, जाखोरी, पळसे, चांदगिरी या स्थानिक गावातील नागरिकांना मात्र हा टोल नाका जिझिया कराचे ठिकाण ठरू लागला आहे. स्थानिक नागरिकांना या टोल नाक्यावर कोणत्याही प्रकारची सवलत मिळालेली नसल्याने स्थानिक नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. शिंदे गावासह पळसे, मोह, चिंचोली, जाखोरी आणि चांदगिरी या लगतच्या गावांतील नागरिकांना शिंदे टोलनाक्यावर टोलमधून वगळण्यात यावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. या गावांना शिंदे टोलनाक्यावर टोलमुक्ती का नाही असा सवालही नुकतेच दौर्यावर आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनाही स्थानिक नागरिकांनी विचारला होता. परंतु, मंत्री महोदयांनीही या प्रश्नावर कायमस्वरुपी तोडगा न काढताच बगल दिल्याने शिंदे येथील नागरिकांची जखमआणखी चिघळली आहे. मात्र स्थानिक नागरिकांची ओळख सिद्ध करणारी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्याने आम्ही नियमाप्रमाणाचे टोल वसुली करू, अशी माहिती टोल नाका प्रशासनाने दिली आहे. माणुसकीच्या भावनेतून स्थानिक शेतकरीवर्गास टोलमधून मुक्ती दिली असल्याचा खुलासाही स्थानिक टोल प्रशासनाकडून केला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *