वाहनावरील नेमप्लेट काढणार्या अधिकार्याला नेत्याकडून मारहाण

झारखंडमधील एका भाजपा नेत्याने परिवहन विभागाच्या एका अधिकार्याला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या नेत्याच्या चार चाकी वाहनावरील नेमप्लेट काढण्यासाठी हा अधिकारी गेला होता. त्याचवेळी या भाजपा नेत्याने शिवीगाळ करत त्या अधिकार्याला मारहाण केली. हा व्हिडिओ झारखंडमधील लातेहर जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येते.
सरकारी आदेशानुसार मंगळवारी परिवहन अधिकारी एफ. बारला हे भाजपा नेते राजधानी यादव यांच्या पोलीस अधीक्षक कार्यालयानजीक उभ्या असलेल्या वाहनावरील नेमप्लेट काढण्यासाठी गेले होते. बारला हे कर्मचार्याकडून ती नेमप्लेट काढून घेत असल्याचे व्हिडिओत दिसते. त्याचवेळी यादव हे पळत-पळत आले आणि त्यांनी थेट बारला यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरूवात केली. कोणाच्या आदेशाने ही नेमप्लेट काढत आहे असा जाब यादव हे बारला यांना विचारत होते. त्यांनी बारला यांच्या तोंडावर ठोसे लगावल्याचे व्हिडिओत दिसते.
नेमप्लेट काढण्यापूर्वी मला नोटीस दिली होती का, असा सवाल त्यांनी बारला यांना विचारला. त्यावेळी बारला यांनी वृत्तपत्रात यासंबंधी सूचना दिल्याचे सांगितले. तरीही यादव हे शिवीगाळ करत होते. बारला यांना रस्त्यावर ढकलून दिले. यात बारला हे किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात येते.
माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार या घटनेनंतर अधिकार्यांनी राजधानी यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यादव यांना अटक न केल्यास कर्मचार्यांनी ‘लेखणी बंद’ आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी राजधानी यादव यांना अटक केल्याचे सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *