संयमी जळगावकरांचा उफाळला प्रक्षोभ

जळगाव शहर राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून, गेल्या काही वर्षात महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. महापालिका निधीतून रस्ते गटारींसारखे एकही विकासकामे झालेले नाही. अनेक वर्षांपासून सामान्य जळगावकरांना मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी झगडावे लागत आहे. रस्त्यातील खड्डे, तुंबलेल्या गटारी असो की, मोकळ्या भूखंडांवरील अस्वच्छता असो, सामान्य जळगावकर चालायचेच म्हणत आला आहे. त्यामुळेच जळगाव जिल्ह्यातील नेते एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी तर सामान्य जळगावकर हा संयमासाठी प्रसिद्ध आहे. वाघूर धरणात मुबलक पाणी असताना दररोज मिळणारे पाणी एक दिवसाआड व नंतर दोन दिवसाआड करण्यात आले. याचा साधा जाबदेखील कधी जळगावकरांनी प्रशासनाला विचारला नाही. वर्षभरात दुरुस्तीच्या नावाखाली अनेकदा आठ दिवस पाणीपुरवठा झाला नसतानाही जळगावकरांनी पैसे देऊन टँकरने पाणी घेतले पण ब्र शब्द काढला नाही. वर्षातून एक महिना तरी पालिका प्रशासन सांगते म्हणून पिवळे पाणी निमूटपणे प्यायचे आणि न चुकता २ हजार रुपये पाणीपट्टी भरायची हा सहनशील जळगावकरांचा नित्यक्रमआहे. अनेक समस्यांशी जळगावकरांना कायमझुंजावे लागते. असे असतानाही अपवाद वगळता कधीही नागरिकांनी मोर्चा काढल्याचे स्मरत नाही. अर्थात शहरातील सर्व सामान्य जनता सोशिक आहे. मात्र, समांतर रस्त्यांअभावी महामार्गावर जाणारे तरुणांचे बळी संयमी जळगावकरांना प्रक्षोभित करून गेले. बुधवारी (दि. १०) समांतर रस्ते कृती समितीने यासाठी जळगावकरांना साद दिली, आणि तब्बल सात हजार जळगावकर स्वयंस्फूर्तीने रास्ता रोको साठी घराबाहेर पडले. जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गाचे समांतर रस्ते विकसित न केल्याने गेल्या काही वर्षात अपघातांची संख्या वाढली आहे. मागील एका वर्षामध्ये ४५२ अपघात झाले. शेकडो वाहनधारकांना जीव गमवावा लागला. सन २०१२ ते २०१७ या कालावधीत २२०० हून अधिक नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तरुणांचीच संख्या जास्त आहे.

सुमारे १५ किलोमीटरचा शहरातून गेलेल्या या हायवेला मध्यवर्ती भागात काही अंतरावरच समांतर रस्ते आहेत. गणपती हॉस्पिटल ते प्रभात चौक, राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालय ते इच्छादेवी चौक या एकाच हायवेच्या बाजूला पक्का समांतर रस्ता आहे. तर बहिणाबाई उद्यान ते शिव कॉलनीपर्यंत दोन्ही बाजूला कच्चे समांतर रस्ते आहेत. मात्र इतर ठिकाणी कच्चेदेखील समांतर रस्ते नाहीत. यामुळे हायवेवरच्या अवजड वाहतुकीतून आपल्या दुचाकीवरून मार्ग काढणार्या महाविद्यालयीन युवा वर्गाचा बळी जात आहे. चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या एकुलत्या मुलाचा या महामार्गावरच अपघाती मृत्यू झाला होता. समांतर रस्त्यांअभावी हे अपघातसत्र थांबत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शहरातील एक नागरिक सोपान पाटील व त्यांच्या पत्नी यांनी पालिका व शासनाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी यासाठी उपोषण केले. यासोबतच कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष डॉ. राधेश्यामचौधरी यांनी गांधी मार्च आंदोलन केले. त्यानंतर जळगावातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येऊन समांतर रस्ते कृती स्थापन केली. समांतर रस्त्यासाठी नेत्यांना भेटून निवेदने देण्यात आली. इतके होऊनही शासन व महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबत चालढकल सुरूच ठेवली होती. अखेर कृती समितीने समांतर रस्त्यांसाठी आंदोलनाची हाक दिली. इतर समस्या सहन करणार्या जळगावकरांचा संयमाचा बांध फुटला होता. त्याची प्रचिती म्हणजे बुधवारी अजिंठा चौकात सुमारे ७ हजार जळगावकरांनी एकजूट दाखवून महामार्ग अडवून ठेवला. रास्ता रोको आंदोलन ५० मिनीटे होते. यादरम्यान आंदोलकांनी पाळलेली शिस्त व शांतता लक्ष वेधून घेणारी होती. रस्त्यावरून जाणार्या रुग्णवाहिकांना आंदोलकांनी मार्ग करून दिला. कृती समितीने केलेले नियोजन व जळगावकरांची शिस्तबद्धता निश्चितच कौतुकास्पद होती. विशेष म्हणजे फोटोसाठी चढाओढ व भाषणबाजी नसल्याने आंदोलनाची धग लक्षात येत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *