महामार्गावर दुरुस्ती, अवजड वाहनांना बंदी

नवी मुंबई ः पनवेल महामार्गावरील वाशी खाडी पुलाच्या वाशीहून मानखुर्दकडे जाणार्‍या मार्गिकेची दुरुस्ती शनिवारपासून सुरू करण्यात आली. त्यामुळे मुंबईहून वाशीकडे येणार्‍या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही अवजड वाहने ऐरोली पुलावरून वाशीकडे जात आहेत. त्यामुळे ऐरोली पूल, पटनी कंपनी मार्ग, तसेच ठाणे-बेलापूर मार्गावर सोमवारी सकाळपासूनच वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नोकरदारांची रखडपट्टी झाली. शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने वाहतूक कोंडीचा फटका बसला नव्हता. सोमवारी दैनंदिन कामकाजाचा दिवस असल्यामुळे मोठी कोंडी झाली.

वाशी खाडी पुलाच्या वाशीहून मानखुर्दकडे जाणार्‍या मार्गिकेतील पुलाचे प्रसरण सांधे (जॉइंट) बदलण्याचे हे काम२३ फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार आहे. हे कामरात्रंदिवस करण्यात येत आहे. यादरम्यान वाशीकडून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने या नवीन खाडी पुलावरील उत्तर मार्गिकेवरून (मुंबईहून पनवेलकडे येणारी मार्गिका) सोडण्यात येत आहेत. तसेच मुंबईकडून वाशीकडे येणारी हलकी वाहने नवीन पुलाच्या लगत असलेल्या जुन्या खाडीपुलावरून सोडण्यात येत आहेत. मुंबईहून वाशीकडे येणार्‍या अवजड वाहनांना या पुलावरून येण्यास पूर्णपणे बंदी असून ही वाहने ऐरोली पुलावरून सोडण्यात येत आहेत. अवजड वाहने ऐरोली पुलावरून सोडण्यात येत असल्यामुळे या ठिकाणी सोमवारी सकाळी मोठी कोंडी झाली होती.

घणसोली, महापेतही रस्त्यांची कामे

अवजड वाहने ऐरोली पुलावरून पटनी कंपनीमार्गे ठाणे-बेलापूर मार्गावरून वाशीकडे जात होती. मात्र ठाणे-बेलापूर मार्गावर घणसोली येथे उड्डाणपुलाचे कामसुरू आहे. तर महापे येथे भुयारी मार्गाच्या कामामुळे अवजड वाहने ही एमआयडीसीमार्गे वाशीकडे जात आहेत. त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरदेखील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी व संध्याकाळी वाहतूक कोंडी होत आहे. मात्र दुपारी प्रवाशांना दिलासा मिळत आहे, असे वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचांर्‍यानी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *