वाहतूक कोंडी दूर होणार; वाहनतळास मंजूरी

ठाणे ः ठाणे शहरातून जाणार्या महामार्गालगत तसेच घोडबंदर, वागळे इस्टेट परिसरात रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी करण्यात येत असल्याने होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने बाळकुमभागात आरक्षित केलेल्या तीन हेक्टर जागेवरील वाहनतळास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. पालिकेच्या विकास आराखडयात हा भूखंड एसटी महामंडळाचे बस आगार तसेच अन्य कामांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र, विनावापर वर्षांनुवर्षे पडून असलेल्या या जागेचा वापर अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी करण्याचा फेरबदलाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने राज्य सरकारकडे पाठविला होता. त्यास मंजुरी मिळाल्याने आता शहरात येणार्या अवजड वाहनांच्या कोंडीचा प्रश्न सुटू शकणार आहे.
ठाणे शहरात दैनंदिन दळणवळणाकरिता ट्रक, टेम्पो, बसगाडया तसेच अवजड वाहनांचा राबता गेल्या काही वर्षांपासून वाढला असून या वाहनांसाठी पुरेशा प्रमाणात वाहनतळ नसल्याने वाहतूक नियोजनाचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेच्या विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शहरातील खासगी ठेकेदारांच्या मोठया बसगाडया सकाळ, रात्रीच्या वेळेत रस्त्यांच्या कडेला उभ्या केल्या जातात. त्यामुळे अरुंद रस्त्यांची समस्या असलेल्या भागांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या आ वासून उभी राहिली आहे. जुन्या शहरासह वागळे इस्टेट, घोडबंदर सेवा रस्ते तसेच महामार्गालगत असलेल्या सेवा रस्त्यांवर ही अवजड वाहने तसेच शाळेच्या बसेस उभ्या केल्या जात असल्याने या भागात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या वाहनांवर वाहतूक पोलिसांमार्फत कारवाई केली जात असली तरी हा वरवरचा उपाय ठरत होता. त्यामुळे ठाणे महापालिकेने बाळकूमयेथील जागेत अवजड वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था उभी करण्याचा प्रस्ताव तयार केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *