एक्स्प्रेस वेसाठीही वृक्षांची कत्तल

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पासाठी झाडे तोडण्यावरून गेल्या दीड वर्षांपासून वाद सुरू असताना आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेच्या विस्ताराकरिताही सुमारे आठ हजार झाडे तोडावी लागणार आहेत. त्या मोबदल्यात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) जालना जिल्ह्यात ८० हेक्टर जागेवर वृक्षारोपण करणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली ते खंडाळा या घाटमार्गात नव्या मार्गिकेसह (मिसिंग लिंक) मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे व राष्ट्रीय महामार्गाचे आवश्यकतेनुसार रूंदीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. अडोशी ते खंडाळा हा सहापदरी मार्ग असताना या मार्गावरून दहा मार्गावरून जाईल एवढी वाहतूक होत असते. प्रचंड वाहतूक आणि अधूनमधून कोसळणार्या दरडींमुळे या मार्गावर वाहतुकीची अनेकदा कोंडी होत असते. ही कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीने १९९५ मध्ये घाटमार्गाला पर्याय सुचवला होता. त्यानुसार एक्स्प्रेस वेचे रूंदीकरण व घाटमार्गात बोगद्याचे कामहाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पाअंतर्गत खोपोली ते सिंहगड दरम्यान आठ किमी लांबीचे प्रत्येकी चारपदरी असे दोन बोगदे खोदण्यात येणार असून अशा प्रकारचे बोगदे भारतात पहिल्यांदाच बांधले जाणार आहेत. त्याचबरोबर २०० मीटर उंचीचे व प्रत्येकी ८०० मीटर लांबीचे दोन पूल बांधले जाणार आहेत. प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून आता आलेल्या निविदांमध्ये कमी दराची निविदा कोणत्या कंपनीने सादर केली आहे हे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *